
सामना प्रतिनिधी, मुंबई
तरुणांना भेडसावणाऱया समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. ‘आदित्य संवाद’ या मोहिमेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभरातील तरुणांपर्यंत पोहोचणार आहेत. यासाठी संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई अशा पाच ठिकाणी ‘आदित्य संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुणांना भेडसावणाऱया अनेक प्रश्नांवर सिनेट, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारपर्यंत दाद मागून ते प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने कायम पुढाकार घेतला. याच पार्श्वभूमीवर राजकारणापासून विविध क्षेत्रांबाबत तरुणांचे काय मत आहे, त्याचप्रमाणे त्यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम असल्याचे युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 18 ते 35 वयोगटातील ज्या तरुणांना आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा आहे त्यांनी www.adityasanvad.com या वेबसाइटवर आपले नाव रजिस्टर करायचे आहे.
पहिला कार्यक्रम संभाजीनगर येथील सरस्वती भव येथील महाविद्यालयात 2 एप्रिल रोजी, दुसरा कार्यक्रम 7 एप्रिल रोजी नाशिकमध्ये, तिसरा कार्यक्रम 13 एप्रिल रोजी कोल्हापूरमध्ये, चौथा कार्यक्रम 21 एप्रिल रोजी मुंबईत तर पाचवा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. यापैकी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे. पाच शहरांतील सुमारे पाच हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा ‘आदित्य संवाद’चा पहिला टप्पा असून राज्यभरातील सर्व तरुण भविष्यातील बैठकीचा भाग म्हणून www.adityasanvad.com या वेबसाइटवर आपली नोंदणी सुरू ठेवू शकतात.




























































