
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ताफा येथील पार्थीकर कॅम्पसमोरून जात असताना येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी संभाजीनगर – जालना रस्त्यावर उभे राहिल्याचे दिसताच आदित्य ठाकरे यांनी ताफा थांबवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी बदनापूर येथे एमआयडीसी उभारून रोजगारनिर्मिती करावी अशी मागणी केली. तर विद्यार्थिनींनी बदनापूर येथे बसस्टँड नसल्यामुळे अडचण होत असल्याची कैफियत मांडताच या दोन्ही गोष्टींवर लवकरच काम सुरू करण्याची ग्वाही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे जालना दौऱ्यावर असून शनिवारी सकाळी 10 वाजता बदनापूर येथे त्यांचे आगमन होणार होते. सकाळपासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे येणार म्हणून सामान्य जनतेतही मोठे आकर्षण होते. येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेच्या पार्थीकर कॅम्पमधील विद्यार्थ्यांनाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्यामुळे ते रिमझीम पावसात रस्त्यावर उपस्थित होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याचे तेथे आगमन झाले. मोठ्या संख्येने विद्यार्थी बघताच आदित्य ठाकरे यांनी ताफा थांबवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तांत्रिक शिक्षणाबरोबरच सर्व शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून बदनापूर तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे बेरोजगारीची समस्या असल्याचे सांगितले. तसेच जालना येथील औद्योगिक वसाहतीत फॉर्मासिटयूकल कंपन्या नसल्यामुळे त्या कंपन्या उभारण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनी ताबडतोब ही गोष्ट मान्य करत आपण या बाबत पाठपुरावा करू असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थिनीची उपस्थित असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींना समस्या विचारल्या असता त्यांनी बदनापूर तालुक्याचे ठिकाण असूनही पार्थीकर कॅम्प येथे जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे येथे बस स्थानक बनवण्याची मागणी केली. यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी याबाबत चर्चा करून येथे बसस्थानक लवकरात लवकर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबर सेल्फी घेतल्या. तसेच आदित्य ठाकरे यांनीही या विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी पाथ्रीकर कॅम्प्समधील इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट, इन्स्टीटयूट ऑम्फार्मसी व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील चारशे ते पाचशे विद्यार्थी उपस्थित होते. युवासेनाप्रमुख ठाकरे यांनी बसमधून उतरत थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन संवाद साधल्याने विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मनमोकळेपणे मांडले असून बदनापूर तालुक्याच्या समस्यांची मला जाणीव असून मूलभूत सुविधा सुधारण्यावर आमचा भर राहणार असून विद्यार्थ्यांची मुख्य भूमिका यात राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचे बदनापूर तालुक्यात आगमन होताच विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. कडेगाव फाटा येथे स्वागत झाल्यानंतर बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातही युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भगवान कदम, अमोल ठाकूर, राजू अहिरे, शहरप्रमुख राजेंद्र जऱ्हाड, शिकूर मिर्झा, पदमाकर पडूळ, कैलास चव्हाण, राजेश जऱ्हाड, भरत मदन, श्रीराम कान्हेरे, अंकुश शिंदे, बाबासाहेब शिंदे,सुनील बनकर, अंबादास कोळसकर, कैलास खैरे, महादू गिते, सुदाम काळे, दत्ता जगताप, गजानन बोंद्रे, किशोर मदन, सुभाष आरसूळ, किशोर मदन आदींसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

























































