
‘सध्या महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे, हे पाहता युवक-युवतींनी राजकारणात यावे, असे कसे सांगणार?’ असा प्रश्न उपस्थित करतानाच, ‘गद्दारांना त्यांची जागा दाखवून राजकारणातही चांगल्या माणसांना स्थान असते, हे मी सिद्ध करून दाखवीन,’ असा दुर्दम्य आत्मविश्वास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जयसिंगपूर येथे व्यक्त केला आणि गद्दारांना मूँहतोड जवाब दिला.
कोल्हापूरनंतर आज जयसिंगपूर येथे आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ला तुफान गर्दी झाली होती. पावसाची तमा न बाळगता, आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधत सर्वांचीच मने जिंकली. विक्रमसिंह क्रीडांगणावर आदित्य ठाकरे यांच्या सभेने आजवरचे गर्दीचे सगळे उच्चांक मोडीत काढले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, कोल्हापूर-सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, साक्षी महाडिक उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांची सभा होणार असल्याने संपूर्ण शिरोळ तालुक्यात जल्लोषी वातावरण होते. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील शिरोळ तालुका मराठा मंडळ कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर तेथून सभास्थानापर्यंत सुमारे दोन हजार दुचाकींची रॅली काढण्यात आली. सभास्थळी महिला आघाडीच्या रणरागिणींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. व्यासपीठावरून आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून अभिवादन करताच ‘जय भवानी… जय शिवाजी…’, ‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा…’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
आदित्य ठाकरे यांनी थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कोकणातून येथे येईपर्यंत अनेक ठिकाणी लोकांनी माझे उत्स्फूर्त स्वागत केले. आजही येथे तुम्ही एवढय़ा मोठय़ा संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, हे पाहून मन भरून आले आहे. सध्या महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण सुरू आहे, ते तुम्हाला पटतेय का? बेइमानी पटणारी आहे का? या गद्दारांसोबत तुम्ही आहात का?’ असे सवाल करताच, उपस्थितांनी ‘नाही… नाही…’चा पुकारा केला. ‘इथल्या खासदारांना आम्ही मित्र मानले. त्यांनी बोट दाखविले, त्यासाठी निधी दिला. डोळे बंद करून त्यांना मिठी मारली; पण त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, याचे वाईट वाटते. अनेकांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, मंत्रिपदे दिली, जनतेत ओळख दिली. लायकीपेक्षा जास्त दिले, हेच आमचे चुकले. सगळे मिळाल्यामुळे त्यांना अपचन झाले आणि हे गद्दार ‘हाजमोला’ खाण्यासाठी पलीकडे गेले,’ असा टोला आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना हाणला.
‘गद्दारांमध्येही दोन गट आहेत,’ असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पहिला गट आहे तो दडपणवाल्यांचा! आता हे दडपण कोणाचे, ते तुम्हाला माहीत आहे,’ असे सांगताच जनसमुदायाने ‘ईडी… ईडी…’च्या घोषणा दिल्या. ‘दुसरा गट आहे तो फसवून नेलेल्यांचा! ‘आपल्यासोबत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पूर्ण शिवसेना आहे,’ असे सांगून फसवून नेलेलेही त्यात आहेत. या फसलेल्यांना जर खरेच वाटत असेल, तर तुमच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे नेहमीच उघडे आहेत,’ असे सांगत, ‘जेथे जाल तेथे आनंदी राहा, सुखी राहा; पण आधी पदांचे राजीनामे देऊन निवडणुकीच्या रिंगणात सामोरे या! एकदा होऊनच जाऊ दे!’ असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदार आणि खासदारांना दिले.
‘‘आपण हिंदुत्वासाठी बाहेर पडलो,’ असे निर्लज्जपणे हे गद्दार सांगतात. ‘क्रांती केली, बंड केले,’ असे ते कितीही म्हणत असले, तरी त्यांची नोंद ‘गद्दार’ म्हणूनच घेतली गेली आहे. बंड किंवा क्रांती असती तर महाराष्ट्रातच राहून त्यांनी सर्व केले असते. सुरत, गुवाहाटी, गोवा येथे मजा करीत फिरला नसता,’ असे सांगत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांचा समाचार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तेथेही पूरपरिस्थिती आहे. मात्र, मंत्रिमंडळात तिसरा माणूसच नाही. हे ऊठसूट दिल्लीला जातात अन् परत येतात. मात्र, पूरग्रस्तांना दिलासा द्यायला यांच्याकडे वेळ नाही. हे असले बेकायदा सरकार कोसळणारच आहे,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे, माजी तालुकाप्रमुख सतीश मलमे, शहरप्रमुख तेजस कुराडे, गुंठेवारी विकास सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल चव्हाण, अण्णासाहेब बिलोरे, शिवाजी जाधव, मलकारी लवटे, महादेव गौडत, धनाजी मोरे, नगरसेवक पराग पाटील, युवासेनेचे नीलेश तवंदकर, आकाश शिंगाडे, अनिल पवार, प्रतीक धनवडे उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
सभेच्या प्रारंभी हाजी फैजुलकरीम डांगे यांच्यासह जवळपास दीडशे हाजी मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच वेळी ‘देवा ग्रुप’चे आसिफ विजापुरे, वार्ंनग स्पोर्ट्स, सेवालाल मंडळ, शानदार स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन संस्था सदस्यांसह झाकीर हुसेन जमादार, शहेनशहा जमादार, इलाई जमादार, अल्लाउद्दीन नदाफ, मुसा हेबाळकर, मेहबूब मणेर आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ‘शिवबंधन’ बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
आदित्य ठाकरे व्यासपीठावर येत असताना कुरुंदवाडचे राजू आवळे व त्यांच्या सहकाऱयांची हलगी आणि ताशा निनादत होता. आदित्य ठाकरे त्यांना ‘थांबा… पुरे झाले माझे स्वागत!’ असे सांगत असतानाही त्यांची हलगी आवेशाने कडाडत होती. यावेळी जनसमुदायानेही टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना साथ दिली. आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन करताच त्यांच्यासमोरच बसलेल्या रहिम पठाण या तरुणाने अशी काही आरोळी ठोकली की, त्याला आपल्याजवळ बोलावून घेत आदित्य ठाकरे यांनी त्याला आलिंगन दिले.
एकनिष्ठ शिवसैनिकाचा केला सन्मान
ऐतिहासिक मिरजकर तिकटी परिसरात काल रात्री उशिरा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यालयात स्वतः खुर्चीत बसण्याऐवजी ‘ही तुमच्या कष्टाची खुर्ची आहे. इथे तुम्हीच बसायचे. मी तुमच्यासोबत फोटो काढतो,’ असे सांगून आदित्य ठाकरे यांनी हर्षल सुर्वे या शिवसैनिकाचा सन्मान केला. हे निष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. ठाकरे परिवाराचे हेच आदर्श संस्कार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख असल्याचा आणि आदित्य ठाकरे आमचे नेते असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना हर्षल सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केली.































































