
देशाची राजधानी दिल्लीतील हवा विषारी झाली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. विषारी हवा आणि दाट धुके अशा दुहेरी कोंडीत दिल्लीकर अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याचा फटका बसला होता. त्याचे विमान जवळपास 1 तास यात अडकले होते. आता याच प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. जीएसटी कौन्सिलप्रमाणे पर्यावरणाचीही कौन्सिल असली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आदित्य ठाकरे यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट करत मांडली.
आदित्य ठाकरे एक्स पोस्टमध्ये म्हणाले, दिल्लीला आज गरज आहे ती प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आराखड्याची आणि त्यावर प्रत्यक्ष कृतीची. सरकारकडून कारणं दाखवणं, भविष्यातील तारखा देणं किंवा मंत्र्यांकडून होणाऱ्या विषयांतराची नव्हे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याला आज ठाम आणि प्रभावी ‘क्लायमेट अॅक्शन प्लॅन’ची गरज आहे. जसे आपण मुंबईसाठी आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी तयार केला होता, अगदी तसाच.
हा आराखडा अशा संस्थांकडून तयार झाला पाहिजे, ज्या अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अभ्यास करून निर्भयपणे व तटस्थपणे अभिप्राय देतात. कारण पारदर्शक व प्रामाणिकपणे अभिप्राय दिला गेला नाही तर त्यावर आवश्यक कृती आणि ठोस कार्यवाही करणे शक्य होणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारला मी यापूर्वीही एक महत्त्वाची सूचना केली होती. जशी जीएसटी कौन्सिल आहे, तशीच कौन्सिल पर्यावरणासाठी देखील असली पाहिजे. भारतातील सर्व राज्यांचे पर्यावरण मंत्री सदस्य असलेली ही कौन्सिल, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आणि अर्थ, वाहतूक, उद्योग, शहरी व ग्रामीण विकास, कृषी, ऊर्जा तसेच इतर संबंधित केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत स्थापन झाली पाहिजे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
What Delhi needs, is a plan in curbing pollution, and action on it.
Not excuses from the government or dates in the future or whataboutery from its ministers.
What all of our States need is a firm Climate Action Plan.
Just like we had made for Mumbai and many other cities of…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 17, 2025



























































