आता महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात, आदित्य ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

गुजरात निवडणुकीत भाजपची विजयी मार्गाकडे वाटचाल करत आहे. गुजरातमध्ये भाजपची आघाडी दिसत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 39 तर, भाजपाचे 27 उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुजरात, हिमाचल आणि पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आतातरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावाव्यात. मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. तसेच, महाराष्ट्रात एका लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊद्या, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

गुजरातमध्ये भाजपा तर हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकशाहीत एका राज्यात एक, दुसऱ्या राज्यात दुसरा पक्ष आला. आता वेळ आली आहे, महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची. कारण, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आलं आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, ते अजून झाल्या नाहीत. आता एवढा मोठा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका घेण्यास काही हरकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.