
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा भेटीला जात आहेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट ते घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांना माध्यमांनी त्यांच्या या दौऱ्याविषयी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरं दिली. सरकार कितीही घटनाबाह्य असलं तरी यंत्रणेकडून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. पण हे सरकार निर्दयी झालं आहे. त्यांच्याकडून मदतीची आत्तातरी अपेक्षा नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
या दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात जो महाराष्ट्रात पाऊस पडला. त्या अनुषंगाने आणि आधीही आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. कारण नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. मागच्या आठवड्यात उद्धव साहेबांनी संभाजीनगरचा दौरा केला. आज देखील मी, अंबादास दानवे, सचिन अहिर आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. ही अपेक्षा आहे की सरकार हे कितीही घटनाबाह्य असलं तरी सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे. त्यासाठीच आम्ही तिथे जात आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सध्याच्या सरकारमधील एकाही मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एक आपण बघितलं असेल की गेल्या साधारण दहा वर्षांपासून उद्धव साहेबांचे शेतकऱ्यांसाठीचे दौरे, भेटीगाठी अगदी बांधावर जाऊन झाल्या आहेत. मग, दुष्काळाच्या वेळी किंवा ओल्या दुष्काळाच्या वेळी महाविकास आघाडी हे पहिलं सरकार असेल ज्यांनी लगेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली. तसंच आज देखील आम्ही जात आहोत. जरी विरोधी पक्षात आहोत तरी राजकीय समाज म्हणून शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आज ते आम्ही करायला जात आहोत. या सरकारकडून आत्तातरी अशा कृतीची अपेक्षा नाही. त्या दिवशी उद्धव साहेब बोलले तसं, हे सरकार निर्दयी झालेलं आहे. शेतकऱ्यांसोबत उभं राहणं आज गरजेचं आहे. तो आपला अन्नदाता आहे. तिथे जाऊन त्यांना धीर देणं एवढं जरी केलं तरी खूप असेल, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.































































