‘वरळी पॅटर्न’ आदर्श ठरेल, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या माध्यमातून वरळीमध्ये विकासकामे वेगाने करण्यात येत असून रहिवाशांच्या सहभागातून वरळी खड्डेमुक्त, कचरामुक्त आणि रोगराईमुक्त करण्यात येणार आहे. विकासाचा हा ‘वरळी पॅटर्न’ बडय़ा शहरांसह संपूर्ण राज्याला आदर्श ठरेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. वरळीतील विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी आज पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली.

वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘वरळी ए प्लस’ उपक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार नागरी सुविधा देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर वरळी खड्डेमुक्त, कचरामुक्त आणि रोगराईमुक्त करण्यासाठी  काम केले जात आहे. वरळीच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका अधिकार्‍यांसोबत बैठका घेतल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन वरळीतील कामांसंबंधी चर्चा केली. वरळीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत असताना स्थानिक रहिवाशांचा सहभाग आणि सहकार्यातून काम सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, वरळीबरोबरच संपूर्ण मुंबई आणि राज्यात दर्जेदार रस्ते बनवण्यासाठी योग्यरीतीने काम सुरू असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून राज्य सरकार आणि पालिका समन्वयाने काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जी-उत्तर ठरेल सांस्कृतिक आदर्श

मुंबईत विविध विकासकामे करीत असताना मुंबईचे सांस्कृतिक वैभवही  जपले जाणार आहे. जी-दक्षिण विभागासाठी पालिका प्रशासनासह नगरसेवकांच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे, तर जी-उत्तर विभागातही याची सुरुवात झाली असून ‘युनिक फुटपाथ’सारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेचा ‘जी-उत्तर’ विभाग सांस्कृतिक आदर्श ठरेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.