बेरोजगारमुक्त, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र घडवणारच, आदित्य ठाकरे यांची ग्वाही

649

पुन्हा एकदा विधान भवनावर भगवा फडकवायचा आहे. आपल्याला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. हा महाराष्ट्र दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, बेरोजगारमुक्त यासह सुजलाम, सुफलाम, हिरवागार, समृद्ध आणि भगवा करावयाचा आहे. हेच आपले स्वप्न आहे. त्यामुळे भगवा घेऊनच पुढे जायचे… असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे शिवसैनिकांमध्ये जागवला. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून दिले तरच हे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगून आपण दिलेले वचन पाळणारच, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर, कागलचे उमेदवार, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासाठी गडहिंग्लज येथील म.दु. श्रेष्ठाr विद्यालयाच्या भव्य प्रांगणात तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार, आमदार सुजित मिणचेकर यांच्या प्रचारासाठी पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या भव्य सभेत आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

ऑगस्टमध्ये उद्भवलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार यांसह शिवसैनिकांनी केलेल्या मदतकार्याचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. यापुढेही शिवसेना सदैव 24 तास जनतेच्या सेवेसाठी राहीलच याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. महापुराच्या काळात शिवसेना नेते व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा उत्तम प्रकारे सांभाळली, याचेही त्यांनी कौतुक केले.

वरळीत कोल्हापूर भवन उभारणार

कोल्हापूर जिह्यातील विशेषतः आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी या ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. या कोल्हापूरकरांसाठी वरळीमध्ये ‘कोल्हापूर भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी गडहिंग्लज येथील प्रचारसभेत शिवसेना पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली. यावर शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरकरांसाठी वरळी येथे कोल्हापूर भवन निर्माण करू, अशी ग्वाही दिली.

शिवसेनेचे संकल्प

  • शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करायचे आहे.
  • अल्पभूधारक शेतकर्‍यांना दहा हजार रुपये देणे.
  • गावागावांत सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करून त्याद्वारे सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरवणे.
  • आजही छोटय़ा गावातून शहरात जाण्यासाठी जादा एस.टी. बस नाहीत. बस चुकली तर विद्यार्थ्यांचा अखंड दिवस वाया जातो. अशा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जादा एसटी बस सुरू करणे.
  • बदलत्या काळानुसार दर्जेदार शिक्षण मिळून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अभ्यासक्रम बदलायचा आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या