पाथर्डी तालुक्यात गारपीटीचा फटका बसलेल्या शेतीची प्रशासनाकडून पाहणी

पाथर्डी तालुक्यात शनिवारी झालेल्या गारपिटीने प्राथमिक माहितीनुसार तीनशे हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रविवारी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी गारपीट झालेल्या भागाची पाहणी केली आहे. तलाठी, कृषी मंडल अधिकारी यांना आल्हणवाडी, घुमटवाडी,चिंचपूर इजदे,कुत्तरवाडी,पिंपळगाव टप्पा,करोडी या भागातील गारपिटीने झालेले शेतीचे नुकसान करण्याचे आदेश प्रसाद मते, शाम वाडकर यांनी दिले आहेत.

तालुक्यात रविवारी झालेल्या गारपिटीत डाळिंब, संत्रा, आंबा, कांदा, गहू,हरभरा व मका या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार तीनशे हेक्टर शेतीतील फळबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिरावून घेतला आहे. गारपिटीने झालेले नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करावी आणि पंचनामे करावे अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.