
>> दुर्गेश आखाडे
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी खासदार ऍड. बापूसाहेब परुळेकर यांची ओळख एक सच्चा कार्यकर्ता, कायदेतज्ञ, तत्वनिष्ठ राजकारणी,उत्कृष्ट संसदपटू आणि एक मार्गदर्शक अशी होती.बापूसाहेब परुळेकर म्हणजेच चंद्रकांत काशीनाथ परुळेकर यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
बापूसाहेबांचा जन्म 11 जुलै 1928 रोजी मुंबईत झाला. बापूसाहेबांचे आजोबा रावबहादूर परुळेकर यांनी 1887 साली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यांचा वारसा बापूसाहेबांनी पुढे नेला.बापूसाहेबांनी 1951 साली वकिली सुरू केली. त्यांची वकिली 1995 पर्यंत सुरु होती.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि गोवा याठिकाणी त्यांनी वकिली केली. वकिली व्यवसायात बापूसाहेबांनी एक आदर्श निर्माण केला होता. दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही शाखांमध्ये त्यांनी यश मिळवल्याने त्याकाळात यशस्वी वकील म्हणून ते नावारूपाला आले होते.बापूसाहेब एखाद्या खटल्याचा बारकाईने अभ्यास करत असत. सर्व कागदपत्रांच्या टिपा, तळटिपा ते अभ्यासत असतं. बापूसाहेब दिवसाचे 18 तास काम करत होते. त्यांच्यामध्ये शिस्त, व्यासंग आणि मेहनतीचे दर्शन घडत असे.
भरदार शरीरयष्टी,साजेशी अशी उंची आणि प्रचंड आत्मविश्वास असणारं बापूसाहेबांचे व्यक्तिमत्त्व होते. हळूहळू बापूसाहेब राजकारणात आले. 1971 साली त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी शामराव पेजे यांनी त्यांचा पराभव केला होता. पहिल्या पराभवानंतर निराश न होता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. 1977 जनता पक्षाच्या तिकिटावर बापूसाहेबांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी विजय खेचून आणला. त्यानंतर त्यांनी 1980 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱयांदा विजय मिळवला. 1980 च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात जनता पार्टीची धूळधाण उडाली होती.जनता पार्टीचे फक्त दोनच खासदार निवडून आले होते त्यामध्ये ऍड. बापूसाहेब परुळेकर यांचा समावेश होता.1980 साली भारतीय जनता पक्षाची बांधणी सुरू झाली तेव्हा बापूसाहेबांनी तत्त्वनिष्ठता दाखवली. जनता पार्टीच्या तिकिटावरची खासदारकी सोडणे त्यांच्या तत्त्वात बसणारे नव्हते. उत्कृष्ट वक्तृत्व, संयमी स्वभाव आणि अभ्यासू वृत्तीमुळे बापूसाहेबांनी संसदेत स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून बापूसाहेब परुळेकर सर्वांसाठी आदर्श राहतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वैचारिक अधिष्ठान बापूसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला लाभले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. सावरकरांचे विचार घेऊन ते कार्यरत राहिले होते. बापूसाहेबांचे वडील हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी होते. बापूसाहेबांनीही सावरकरांसोबत काम केले होते. आणीबाणीच्या काळात बापूसाहेबांनी सोळा महिने कारावास भोगला होता.
मुंबई, बेळगाव आणि कारवारसह महाराष्ट्र या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईत सुरू झाली. त्याचवेळी ती कोकणातही पसरली. बापूसाहेब परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. रत्नागिरी संयुक्त महाराष्ट्र समिती अशा नावाने एक समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचे प्रमुख बापूसाहेब परुळेकर होते. त्यावेळी मोर्चा,जाहीर सभा आणि गावागावात मशाल यात्रा काढण्यात येत होती. बापूसाहेब जनसंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष होते. प्रमोटर मेंबर म्हणून ते रोटरी क्लब रत्नागिरीचे सदस्य होते. पोस्टर ऍडव्हाझर कम्युनिटी ऑफ महाराष्ट्र स्टेट या संस्थेत त्यांनी काम पाहिले. त्यांनी रत्नागिरी शिक्षण संस्था, फाटक हायस्कूल, पतितपावन यांसारख्या संस्थांचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषविले होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक क्रतस्थ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.


























































