
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईत अपघात होणं ही काही मोठी बाब नाही. पण, हल्ली माणुसकी संपत चालल्याचा ओरडा होताना दिसतो. अपघातग्रस्ताला मदत करण्यापेक्षा फोटो किंवा व्हिडीओ काढण्यात लोकांचं जास्त लक्ष असतं. पण, माणसातली संवेदनशीलता अजूनही कायम असल्याचं चित्र १३ जून रोजी अपघात झालेल्या तरुणांना माधव जामदार यांच्या रुपाने दिसलं.
व्यवसायाने वकील असलेले माधव जामदार हे १३ जून रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमाराला त्यांच्या फोर्ट येथील कार्यालयातून घरी जाण्यास निघाले. वाटेत जे.जे. उड्डाणपुलावर त्यांना एक मोठा अपघात झाल्याचं दिसलं. ४ तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते. जामदार यांनी गाडी थांबवून त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, मात्र ते चारही तरुण गंभीर जखमी झाले होते. परिस्थितीची जाणीव होताच जामदार यांनी ताबडतोब त्या चारही जणांना आपल्या गाडीत घातलं. आपला चालक अमोल शिंदे आणि लिपिक तेजस देऊलकर यांच्या मदतीने जामदार यांनी त्या तरुणांना जे.जे. रुग्णालयात दाखल केलं.
दुर्दैवाने यातील एका तरुणाला रुग्णालयाने मृत घोषित केलं. दुसऱ्या तरुणाच्या मेंदुला दुखापत झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिसऱ्या तरुणाचा पाय कापावा लागला, तर चौथा तरुण गंभीर दुखापतीमुळे बोलण्याच्या अवस्थेतही नव्हता. त्यामुळे जामदार यांनी त्याच्या घरी अपघाताचे वृत्त कळवले. पुढील उपचारांसाठी त्यांनी स्वतःकडील पाच हजार रुपये देऊन ते रात्री १२ वाजता आपली संपूर्ण रक्ताने भिजलेली गाडी घेऊन माधव जामदार घराकडे निघाले.

























































