अहो आश्चर्यम्! चंद्रावर पहिल्यांदाच कार रेसिंगचा थरार!!

कार रेसिंग हा प्रकार तसा नवा नाही. पण चंद्रावरच कार रेसिंग झाली तर? ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असले तरी हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पुढच्या वर्षी चंद्रावर रोबोटिक कार रेसिंग होणार आहेत. अमेरिकेची एअरोस्पेस कंपनी मून मार्कच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले असून या रेसमध्ये वैज्ञानिक नाही, तर विद्यार्थी भाग घेणार आहेत. यासाठी तब्बल 74 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मून मार्क ही कंपनी या अनोख्या स्पर्धेसाठी एलन मस्क या स्पेस एक्स कंपनीची मदत घेणार आहे. स्पेस एक्स फाल्कन 9 या रॉकेटच्या माध्यमातून या रोबोटिक कार चंद्रावर पाठवणार आहे.

विद्यार्थीच करणार कारचे डिझाईन

या स्पर्धेसाठी देशभरातील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या टीमची निवड केली जाणार आहे. एका टीममध्ये पाच-पाच विद्यार्थी असतील. अंतिम फेरीसाठी सहा टीमची निवड केली जाईल. त्यातील दोन विजेत्यांची निवड चंद्रावर होणाऱया रोबोटिक कार रेसिंगसाठी केली जाईल. विजेत्या टीमला हायब्रीड स्पोर्टस् कार मॅक्लेरेन पी-1चे डिझायनर फ्रँक स्टीफेन्सन यांच्यासोबत कार डिझाईन करण्याची संधी मिळणार आहे.

वायफाय आणि टेलिमेट्रीद्वारे कंट्रोल

स्पेस एक्सचे लॅंडर नोव्हा सीच्या मदतीने अडीच-अडीच किलो वजनाच्या दोन रोबोटिक कार चंद्रावर उतरवल्या जातील. पृथ्वीवरूनच वायफाय आणि टेलिमेट्रीच्या मदतीने या कार कंट्रोल केल्या जातील. चंद्रावर ग्रॅव्हिटी कमी असलेल्या या भागात ही रेस लावली जाईल. रेस ट्रकबद्दल कंपनीने अधिक खुलासा केलेला नाही. परंतु या मिशनसाठी 74 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये या कार चंद्रावर पाठवल्या जातील. पुढच्या वर्षीच्या शेवटी ही स्पर्धा पार पडेल.

आपली प्रतिक्रिया द्या