
अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे आधीच कंबरडे मोडले आहे. एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे बेरोजगारी, भूकंप, निर्वासितांचे लोंढे अशा कात्रीत अडकलेल्या अफगाणी जनतेसमोर आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अफगाणिस्तानात भुकेने हाहाकार निर्माण झाला आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तानला मिळणाऱया आंतरराष्ट्रीय निधीत मोठी कपात झाली आहे.
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीच्या ताज्या अहवालानुसार, 2025 मध्ये अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक म्हणजेच सुमारे 2.29 कोटी जनता केवळ मदतीच्या आशेवर जगत आहे. अशातच अमेरिका आणि इतर देशांनी आपला मदतीचा हात आखडता घेतल्यामुळे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’सारख्या संस्था हतबल झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न कार्यक्रमाने दिलेल्या इशाऱयावरून असे समजते की, या हिवाळ्यात तब्बल 1.7 कोटी अफगाणी नागरिकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 लाखांनी वाढली आहे.



























































