टी-20 क्रिकेटमध्ये राशीद खान सबसे आगे

अफगाणिस्तानचा फिरकीवीर राशीद खानने यूएईविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3 विकेट घेत सर्वाधिक विकेट टिपण्याचा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. त्याने 21 धावांत 3 विकेट टिपत टीम साऊदीच्या 164 टी-20 विकेटला मागे टाकले. राशिद आता 165 विकेटसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

अफगाणिस्तानने 4 बाद 188 अशी धावसंख्या उभारत यूएईला 189 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मोहम्मद वसीम (67) आणि राहुल चोप्रा (52) यांनी यूएईच्या विजयासाठी जोरदार खेळ केला, पण ते संघाला विजयाच्या ट्रकवर आणू शकले नाहीत. वसीम-राहुलने संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरल्यानंतर राशीद आणि शराफुद्दीन अशरफ यांनी यूएईचे धडाधड विकेट टिपत अफगाणिस्तानला विजय पक्का केला. यूएई 150 धावांपर्यंतच मजल मारू शकले. राहुल शेवटपर्यंत नाबाद राहिला. शराफुद्दीनने 24 तर राशीदने 21 धावांत 3 विकेट टिपले. त्याआधी सेदिकुल्लाह अटल (54) आणि इब्राहिम झदरान (63) यांनी 84 धावांची भागी रचत संघाचा मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला होता.

विक्रम मोडीत काढला

राशीदने 98 व्या सामन्यात 165 विकेटचा आकडा गाठत सर्वाधिक टी-20 विकेटचा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे साऊदीने 123 सामन्यात 164 विकेट टिपले होते तर राशीदने 25 सामने कमी खेळत हा विक्रम स्वतःकडे खेचून आणला. त्याने आपल्या कामगिरीत 8 वेळा 4 विकेट तर दोनदा पाच विकेट टिपण्याची किमया साधली आहे.