केरळच्या वायनाडमध्ये आढळले आफ्रिकन स्वाइन फिव्हरचे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मानंथवाडी येथील दोन पशुसंवर्धन केंद्रांमध्ये ‘आफ्रिकन स्वाइन फिव्हर’ आढळला आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस, भोपाळ येथे नमुने तपासल्यानंतर दोन पशुसंवर्धन केंद्रातील डुकरांमध्ये हा आजार आढळून आला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एका केंद्रावर काही डुकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात आफ्रिकन स्वाइन आढळल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसऱ्या केंद्रातील 300 डुकरे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही पावले उचलली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने इशारा दिल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जैवसुरक्षा उपाययोजना कडक केल्या होत्या. बिहार आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये ‘आफ्रिकन स्वाइन फिव्हर’चे रुग्ण आढळून आल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. आफ्रिकन स्वाइन फीवर हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हा एक अत्यंत संसर्गजन्य आणि विषाणूजन्य रोग असून तो जंगली आणि पाळीव डुकरांमध्ये आढळतो. त्याचा मृत्यूदर देखील जास्त आहे. या आजारावर अद्याप कोणतीही लस तयार झालेली नाही. या आजाराचा धोका असून डुकराचे मांस उद्योग आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.