
जीवनातील आव्हानांना कसे सामोरे जायचे, हे शिकवणारा शिक्षकच आहे. आज आम्ही जे काही घडलो त्या पाठीमागे शिक्षकांनी घेतलेले परिश्रम कारणीभूत असून, अशा शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचा अपराध मी करणार नाही, अशा भावना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केल्या.
आठ वर्षांपासून महाबळेश्वरमध्ये शिक्षकदिनाचा सोहळा आयोजित करण्यात येत नव्हता. यावर्षी प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पुढाकार घेऊन या सोहळय़ाचे आयोजन केले होते. महाबळेश्वर पालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, ड्रिमलॅण्डचे कैलेश तेजानी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकदिन कार्यक्रमाची सुरुवात सेट गंगाधर माखरिया शाळेमधून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. या रॅलीमधील शिक्षकांनी धोतर, सदरा, जॅकेट व गांधी टोपी असा, तर शिक्षिकांनी पारंपरिक इरकल साडी परिधान केली होती. काही शिक्षकांनी राष्ट्रपुरुषांची व्यक्तिरेखा साकारून रॅलीमध्ये सहभाग घेतला. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य बाजारपेठमार्गे पालिका कार्यालयापर्यंत पोहोचली. या रॅलीमध्ये सर्व शिक्षकांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषेने महाबळेश्वरकरांचे लक्ष वेधून घेतले.
हॉटेल ड्रिमलॅण्डच्या सभागृहात जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी पालिकेच्या वतीने मान्यवरांना सन्मानचिन्ह देण्यात आले, तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शाळांतील विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम, तर पालिका शाळेतील शिक्षिकांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या, गेली आठ वर्षे बंद असलेला शिक्षकदिनाचा सोहळा यापुढे अशाच पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी गेली आठ वर्षांपासून बंद असलेल्या शिक्षकदिन कार्यक्रमाची परंपरा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पुन्हा सुरू करून शिक्षकांचा सन्मान केल्याचे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी शहरातील पत्रकारांच्या वतीने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील शिक्षकांना तणावमुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते, समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सूत्रसंचालन विठ्ठल माने, संतोष शिंदे यांनी केले. मुख्याध्यापक संजय ओंबळे यांनी आभार मानले.

























































