
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानसोबतच्या व्यापारावरही हिंदुस्थानने बंदी घातली असताना पाकिस्तानने यूएईमार्गे जेएनपीए बंदरातुन देशात पाठवलेले 39 पाकिस्तानी कंटेनर डीआरआयच्या अधिकाऱयांनी जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या 1115 मेट्रीक टन मालाच्या कंटेनरमध्ये खजुर, गरम मसाले आदी प्रकारच्या मालाचा समावेश असुन बाजारपेठेत या मालाची किंमत नऊ कोटीच्या घरात आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई डीआरआयच्या अधिकाऱयांनी दिली.
वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकिस्तानने ओळख लपवून हे 39 कंटेनर थेट दुबई, युएईमार्गे जेएनपीए बंदरातुन हिंदुस्थानांत पाठविण्यात आले होते. मात्र या गंभीर प्रकाराची खबर मुंबईच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, युएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ’ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे. या ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत कारवाई करीत अधिकाऱयांनी जेएनपीए बंदरातून पाकिस्तानी 39 कंटेनर जप्त केले आहेत.