
सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक वगैरेचे ढोल वाजवून पाकिस्तानला धडा शिकवल्याची टिमकी वाजवणाऱया नरेंद्र मोदी सरकारने अनाकलनीय निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्या व सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर हिंदुस्थानात असलेली बंदी सरकारने उठवली आहे. ‘मोदी सरकारची प्रचंड मोठी कारवाई’ अशी उपरोधिक टीका या निर्णयावर होत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई केली. त्यावेळी पाकिस्तानी सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट्स, टीव्ही व यूटय़ूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, मंगळवारपासून पाकच्या काही सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम अकाउंट्स पुन्हा झळपू लागले आहेत.
युमना झैदी, दना नीर मोबीन, आहाद रझा मीर, अझान सामी, अमीर गिलानी, दानिश तैमूर यांचे अकाउंट पुन्हा दिसत आहेत. हम टीव्ही, हर पल जीओ आणि एरी डिजिटल या मनोरंजन वाहिन्यांचे यूटय़ूब अकाउंट्सही सुरू आहेत, असे नेटकऱयांनी निदर्शनास आणले. माहिरा खान, फवाद खान आणि आतिफ अस्लम या मोठय़ा सेलिब्रिटींचे अकाउंट्स अद्यापही बंद आहेत.
केंद्राकडून अधिकृत घोषणाच नाही!
बंदी उठवण्याच्या निर्णयाबाबत मोदी सरकारने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. ‘ही शरमेची गोष्ट आहे… हेच करायचं होतं तर दिलजीत सिंगचा ‘सरदार 3’ हा सिनेमा का प्रदर्शित होऊ दिला जात नाही? राष्ट्रवादाच्या नावाखाली बंदी घातली, आता उठवली. काय नौटंकी आहे… अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.