
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या कन्नड सहकारी कारखान्याची 50 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्वीट (X) करत भाजपला टोला लगावला आहे.
ईडीने केलेल्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्वीटर (X) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट केले आहे. ते म्हणाले की,”माझ्या कंपनीवर इडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का? पण भाजपने लक्षात ठेवाव की झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत. आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतचल लागेल हे स्पष्ट होत आहे.
ईडीने केलेल्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले की, ही कारवाई पूर्णत: बेकायदेशीर असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये. प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातचं का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही.
ते पुढे म्हणाले की, वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.

























































