
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेटला विश्वासात न घेता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आणि देशाच्या शेतकऱ्यांचा सौदा करून टाकला. आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफवर स्थगिती आणली आहे. जर मोदींमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी हा व्यापार करार रद्द करून दाखवावा,” असे थेट आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित किसान महाचौपालमध्ये राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी चीन सीमा वाद आणि अमेरिका-हिंदुस्थान व्यापार करारावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला.
राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “जेव्हा चीनचे टँक हिंदुस्थानात सीमेत शिरत होते, तेव्हा लष्करप्रमुखांनी राजनाथ सिंह, अजित डोभाल आणि एस. जयशंकर यांना फोन केले, मात्र कोणाकडूनही उत्तर मिळाले नाही. अखेर जेव्हा पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी लष्करप्रमुखांना स्वतःच्या मर्जीने निर्णय घेण्यास सांगून हात झटकले. कठीण प्रसंगी देशाचे पंतप्रधान गायब झाले होते.”
व्यापार कराराबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून हिंदुस्थान आणि अमेरिकेतील हा करार रखडला होता. कारण अमेरिकेतील बड्या कंपन्यांना सोयाबीन, कापूस आणि मका हिंदुस्थानी बाजारपेठेत विकायचा होता, ज्याला हिंदुस्थानी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, संसदेत घेरले गेल्यानंतर पंतप्रधानांनी अचानक ट्रम्प यांना फोन करून हा करार मान्य केला.
ते म्हणाले की, “अमेरिकेकडे एपस्टीन प्रकरणाशी संबंधित लाखो ईमेल्स आणि व्हिडीओ आहेत. हरदीप पुरी यांचे नाव जाहीर करून अमेरिकेने मोदी सरकारला इशारा दिला आहे की, जर त्यांचे ऐकले नाही तर आणखी पुरावे बाहेर येतील.” राहुल गांधी म्हणाले, “अमेरिकेत गौतम अदानींवर गुन्हेगारी खटला दाखल आहे. अदानी हे भाजप आणि मोदींच्या आर्थिक रचनेचा मुख्य स्तंभ आहेत. त्यामुळे या खटल्यातून त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे हित गहाण ठेवले जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
“देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू दिले गेले नाही. मी नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच मला रोखण्यात आले. मोदींनी अमित शहा यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी उभे राहून गोंधळ घातला,” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.



























































