
आयआयटी मुंबईत शिक्षण घेणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी हवे ते करण्याची जिद्दही असते तरीसुद्धा काहींचे हे स्वप्न पूर्ण होत नाही, परंतु तामीळनाडूमधील अत्यंत ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या तरुणीचे हे स्वप्न साकार झाले असून तिला आयआयटी मुंबईत एयरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिचे नाव एस. योगेश्वरी सेल्वम असे असून ती उंचीला केवळ 3 फूट आहे. ग्रामीण भागातील विरूधुनगर येथे शिक्षण घेणाऱया योगेश्वरीचा आयआयटी मुंबईपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. योगेश्वरीची आई कनागवल्ली या एका फटाका कारखान्यात मजूर म्हणून काम करते, तर वडील सेल्वम एका चहाच्या टपरीवर काम करतात. योगेश्वरीने बारावीपर्यंतचे शिक्षण सत्तूरजवळील एका सरकारी शाळेतून पूर्ण केले आहे. योगेश्वरीला 8 वीपासून विज्ञानाची आवड होती. सुरुवातीला ती मेडिकल सायन्सकडे आकर्षित झाली होती. बारावीपर्यंत तिला जेईई काय असते हेसुद्धा माहिती नव्हते. नान मुधलवन योजनेंतर्गत कल्लूरी कनावू व्हर्टिकलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी तिला आयआयटी परीक्षेसंबंधी माहिती मिळाली.
- एस. योगेश्वरी ही कधीही टॉपर राहिली नाही, परंतु अभ्यासाची तिला प्रचंड आवड आहे. तिचा एक भाऊ बी.कॉम करत आहे. योगेश्वरीने बारावीनंतर जेईई मेन देण्याचा निर्णय घेतला.
- अवघ्या 60 दिवसांत मन लावून अभ्यास करून तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीला कमी गुण मिळाल्यानंतर आईने तिला चांगलेच सुनावले होते, परंतु योगेश्वरीने सांगितले की, ती जेईई परीक्षेत चांगले गुण मिळवून दाखवेल आणि तिने ते खरे करून दाखवले.
- शारीरिक उंची केवळ 3 फूट असल्याने योगेश्वरीला नेहमीच समाजात टोमणे ऐकायला मिळाले, परंतु तिने याकडे दुर्लक्ष करत कठोर परिश्रम, चिकाटी आणि कुटुंबाच्या साथीने यशाला गवसणी घातली आहे.