
सामना ऑनलाईन, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील सौंदाळे गावच्या रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर कारवाई करावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशही दिले होते. आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने इथले ग्रामस्थ गटविकास अधिकाऱ्यांवर संतापले आहेत. त्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषद भवनासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
सौंदाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम तावडे यांनी आपल्या २०१२ ते २०१७ या कालावधीत विविध योजनांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. या आरोपांची देवगड गट विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तावडे हे दोषी आढळले होते. तावडे दोषी आढळल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. तरीही देवगडचे गटविकास अधिकारी तावडेंवर कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.



























































