मराठीप्रेमींनी रणशिंग फुंकले, मराठीच्या भल्यासाठी आझाद मैदानात धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठी शिक्षण कायदा आणि प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात राज्यभरातील मराठीप्रेमी आझाद मैदानात मोठय़ा संख्येने जमून धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मराठी सक्षमीकरणाचा मुद्दा प्राधान्याने घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

राज्यभरात मराठी भाषेसाठी कार्य करणाऱया संस्थांची सहविचार सभा आज मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित करण्यात आली. यावेळी मराठीच्या भल्यासाठी ठोस कृती आराखडा निश्चित करण्यात आला. या अंतर्गत मराठी शिक्षण कायद्याची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. 17 जूनपासून सुरू होणाऱया अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन करण्याचा विचार यावेळी मांडण्यात आला. मराठीसाठी प्राधिकरण, मराठी भाषा भवन, मराठीचा अभिजात दर्जा, मराठी शाळा आणि ग्रंथालयाचे सक्षमीकरण अशा अनेक मुद्दय़ांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक, साहित्य संमेलन अध्यक्ष अरुणा ढेरे, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विजय चोरमारे, मराठी चित्रपट महामंडळ संचालिका वर्षा उसगावकर, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष जयराज साळगावकर, साने गुरुजी स्मारक ट्रस्टच्या नीरजा, ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर, चंद्रशेखर गोखले आदी उपस्थित होते.

 कोणत्या मुद्दय़ावर एल्गार
 महाराष्ट्रातील सर्व शालेय बोर्डामधील पहिली ते बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे.

 सर्व राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात मराठीच्या सक्षमीकरणाच्या मुद्दय़ाची तरतूद.

 मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापनेचा कायदा करणे.

 मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे याचना न करता मराठी ही भाषा अभिजातच आहे, हे सूत्र गृहीत धरून मराठीच्या विकासासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात 500 कोटींची तरतूद करणे.

 मराठी भाष्य भवनासाठी सोयीचा भूखंड उपलब्ध करून देणे, अन्यथा एअर इंडियाच्या इमारतीत पहिले चार मजले मराठी भाषा भवनासाठी आरक्षित करणे.

सुकाणू समितीची स्थापना
मराठीच्या भल्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मधू मंगेश कर्णिक, मानद् अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष उषा तांबे, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मानद् उपाध्यक्ष श्रीपाद जोशी, मिलिंद जोशी, दीपक पवार, कोषाध्यक्ष रेखा नार्वेकर, कार्यवाह चंद्रशेखर गोखले आहेत.

महेश केळुस्कर यांनी प्रस्तावना का केली?
कोमसाप अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असताना तुम्ही सहविचार सभेची प्रस्तावना कशी केली ? राजीनामा मागे घेतला का? असा प्रश्न केला असता डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, राजीनामा मागे घेतलेला नाही व घेण्याचा विचारही नाही. संस्थेच्या अंतर्गत काही गंभीर धोरणात्मक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे निराकरण होईपर्यंत मी कोमसापचे कुठलेही पद स्वीकारणार नाही. पण एक सामान्य सभासद म्हणून यापुढेही कोमसापबरोबर राहणार आहे. याच भूमिकेतून मराठीच्या भल्यासाठी घेतलेल्या सभेत सहभागी झालो आणि प्रस्तावना केली.