
सामना प्रतिनिधी । पारनेर
करंदी येथील रावजी कारभारी चौधरी वय 55 यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी करंदी ग्रामस्थांनी पारनेर पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गवंडी काम करणारे रावजी चौधरी हे सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वस्तीमागील शेतामध्ये लसून तसेच कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. अवघ्या तासभराचे काम असताना साडेतिन वाजले तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने शेतामध्ये जाऊन पाहिले असता तेथे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ तेथे धावून आले. पोलीसांना पाचारण करण्यात आल्यानंतर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पारनेर ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदानासाठी मृतदेह नेण्यात आल्यानंतर संशयास्पद मृत्यू असल्याने पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन करण्याचा सल्ला वैद्यकिय अधिका-यांनी दिला. त्यानुसार रात्रीच मृतदेह पुणे येथे पाठविण्यात आला होता.
मनमिळावू असलेल्या चौधरी यांचा घातपात झाला असावा, असा ग्रामस्थांचा कालपासूनच संशय होता. गुप्तांगावर जबर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असेही सांगण्यात येत होते. सकाळपासून ग्रामस्थ खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते, तर वैद्यकिय अहवाल आल्यानंतर कोणता गुन्हा दाखल करायचा याचा निर्णय घेउ असे पोलिसांचे मत होते. रात्रीत अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल होत नसल्याने संतप्त नागरीकांना मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोर ठियया आंदोलन सुरू केले. पोलीस निरीक्षक बाजिराव पोवार हे प्रशासकिय बैठकीसाठी नगर येथे गेले असल्याने उपनिरीक्षक बालाजी पदमने यांनी निरीक्षक पोवार यांच्याशी चर्चा करून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यास तयार झाले.
गुन्हा दाखल होत नसल्याने काही ग्रामस्थांनी पुण्याहून मृतदेह घेऊन येणारी रूग्णवाहीका पोलीस ठाण्यात आणण्याची तयारीही केली होती, मात्र पोलीसांनी तात्काळ हालचाली करून गुन्हा दाखल केल्याने मृतदेह थेट करंदी येथे नेण्यात येउन सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सरपंच नामदेव ठाणगे, खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, राधुजी ठाणगे, सावळेराम गव्हाणे, भास्कर गव्हाणे, कोंडीभाऊ ठाणगे, दत्तोबा ठागणे, जिजाभाऊ थोरात, सुनिल ठागणे बबन चौधरी, सदाशिव ठाणगे, सनी थोरात यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
चौघांची कसून चौकशी
रावजी चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीसांनी सोमवारी रात्रीच दोन महिला व दोन पुरूषांची कसून चौकशी केली. मंगळवारीही त्यांची चौकशी करण्यात येत होती. अजूनही त्यांची चौकशी करण्यात येणार असून संशयीतांचे जबाब तसेच वैद्यकिय अहवालानंतर चौधरी यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

































































