अग्नेलो वालदारिस कोठडीतील मृत्यू, सात पोलिसांविरोधात खुनाचा खटला चालणार; सीबीआयला चपराक, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित अग्नेलो वालदारिस कोठडीतील मृत्यू प्रकरण सात पोलीस अधिकाऱयांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या सात अधिकाऱयांविरोधात खुनाचा खटला चालवला जाणार आहे. तसा निकाल मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा होऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढणारी सीबीआय तोंडघशी पडली आहे.

वडाळा पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून जात असताना अग्नेलोचा लोकलखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी सात पोलिसांविरोधात हत्या व धार्मिक भावना दुखावल्याचा खटला चालवावा की नाही, असा मुद्दा न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी होता. न्यायालयाने याचा 32 पानी निकाल देत या पोलिसांना चांगलीच चपराक दिली आहे.

मृत न्यायासाठी आक्रोश करू शकत नाही

मृत व्यक्ती न्यायासाठी आक्रोश करू शकत नाही. त्यांच्यासाठी तसे करणे हे जिवंतांचे कर्तव्य आहे, लेखिका लोइस मॅकमास्टर बुजोल्ड यांचे हे प्रसिद्ध उदाहरण आहे. हे उदाहरण मृत व्यक्तींसाठी न्याय, उत्तरदायित्व आणि सन्मान मिळवण्याच्या जिवंतांच्या नैतिक जबाबदारीवर जोर देते. निकालपत्रात याची आठवण करून द्यावी लागत आहे. कारण अग्नेलोचा मृत्यू खून होता की अपघात यावरून वाद आहे, असे खंडपीठाने नमूद केले.

अधिकाऱयांची नावे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पुजारी (तपास अधिकारी), पोलीस उप निरीक्षक शत्रुघ्न तोंडसे, हेड कॉन्स्टेबल सुरेश माने, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र माने, पोलीस पान्स्टेबल विकास सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल तुषार खैरनार यांच्या विरोधात खुनाचा खटला चालणार आहे.

पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार झाला याची कल्पना केली जाऊ शकत नाही. हा अत्याचार इतका क्रूर होता, की पोलिसांची प्रतिमा मलिन होईल. त्यामुळे या निकालपत्रात तो तपशील नमूद केला जात नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

पोलिसांनी कोठडीत केलेल्या अत्याचारामुळे अग्नेलोने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल. या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला असावा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.