
महारेरा सलोखा मंचात ग्राहक आणि विकासकाने केलेल्या समझौता कराराला कायदेशीर अधिष्ठान असल्यामुळे अशा समझौता कराराचा विकासकाने भंग केला तर रेरा कायद्याच्या कलम 63 नुसार तो दंडनीय अपराध ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय महारेरा अध्यक्ष अजोय मेहता यांनी नुकताच दिला आहे.
रेरा कायद्यातील कलम 32 नुसार मुंबई ग्राहक पंचायतीने प्रस्तावित केलेले महारेरा सलोखा मंच गेली चार वर्षे कार्यान्वित आहेत. या सलोखा मंचांत मुंबई ग्राहक पंचायतीचा एक आणि विकासकांच्या संस्थेचा एक, असे दोन प्रतिनिधी असतात. रेरा कायद्यातील प्रस्थापित तक्रार निवारण व्यवस्थेला पर्यायी अशी सोपी, जलदगतीने आणि परस्पर सामंजस्याने तंटा निवारण करणारी ही ‘सलोखा मंचा’ची व्यवस्था आहे. सलोखा मंचापुढे असा समझौता करार करुन सुद्धा काही विकासक या कराराचे पालन न करुन किंवा कराराचा भंग करुन ग्राहकांना नाडत असल्याने मेहता यांनी हा आदेश जारी केला आहे.

























































