अमेरिकेसोबत करारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे डेथ वॉरंट निघाले, राहुल गांधी यांचा जोरदार घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Rahul Gandhi Challenges PM Modi to Cancel US Trade Agreement

अमेरिकेसोबतच्या कथित आर्थिक व्यवहारांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कृषी, लघु-मध्यम उद्योग, डेटा सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी “मोठे वादळ येणार आहे” असा इशारा दिला.

कृषी क्षेत्रावर परिणामाचा इशारा

राहुल गांधी म्हणाले की, सर्वप्रथम कृषी क्षेत्राचे दरवाजे उघडले गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांनी दावा केला की, अमेरिकेतून अक्रोड, बदाम, सफरचंद, डाळी, कापूस, सोयाबीन यांसारख्या कृषी उत्पादनांची आयात वाढल्यास देशातील शेतकरी अडचणीत येतील. “हे वादळ ठरणार आहे,” असे त्यांनी म्हटले.

दरवर्षी 9 लाख कोटींची खरेदी?

गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांनी अमेरिकेला दरवर्षी 9 लाख कोटींची उत्पादने खरेदी करण्याची हमी दिली आहे. “जर भारताने दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन माल खरेदी केला, तर आपल्या लघु आणि मध्यम उद्योगांचे काय होईल? ते संपुष्टात येतील,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या निर्णयामुळे देशाच्या पायाभूत अर्थव्यवस्थेचा कणा असलेले लघु व मध्यम उद्योग यामुळे उद्ध्वस्त होतील.

डेटा सुरक्षेवरही प्रश्न

राहुल गांधी यांनी देशाचा महत्त्वाचा डेटा अमेरिकेकडे दिल्याचा आरोपही केला. “आपल्या देशाचे भविष्य असलेला डेटा पूर्णपणे दिला गेला,” असा गंभीर दावा त्यांनी केला.

ऊर्जा सुरक्षेवर परिणाम?

तिसऱ्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी अमेरिकेला असे आश्वासन दिले की भारत कोणत्या देशाकडून तेल खरेदी करेल हे अमेरिकेच्या सूचनेनुसार ठरेल. “रशिया, इराण किंवा व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून तेल खरेदी करायचे की नाही, हे अमेरिका सांगेल,” असा त्यांचा आरोप होता. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल, असे ते म्हणाले.

“दबावाखाली निर्णय?”

“हिंदुस्थानचा कोणताही पंतप्रधान असे करू शकत नाही,” असे म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्या दिवशी असा कोणता दबाव होता की देशाच्या हिताविरुद्ध निर्णय घेतला गेला? त्यांनी या निर्णयांना “शेतकरी, लघु उद्योग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा डेथ वॉरंट” असे संबोधले.

राहुल गांधी यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.