अजित पवारांचा उमेदवार हद्दपार; सांगली पोलिसांचा दणका

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आझम काझीसह जिह्यातील वेगवेगळय़ा ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. अजित पवार यांची शुक्रवारी सभा होण्यापूर्वीच ही कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपारीचे आदेश दिले आहेत. मिरजमध्ये राहणारे शोएब ऊर्फ मोहम्मद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी, मतीन काझी, अक्रम महंमद काझी, रमेश अशोक कुंजीरे, अस्लम महंमद काझी, आझम महंमद काझी, अल्ताफ कादर रोहिले, मोहसिन कुंडीबा गोद यांना हद्दपार करण्यात आले आहे. या सर्वांना सांगली आणि कोल्हापूर जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. आझम काझी हे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार होते.

आणखी तीन टोळ्यांवर कारवाई

कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज ऊर्फ रमजान मौला शेख, शब्बीर मौल्ला शेख, सौरभ विलास जावीर, अर्जुन ईश्वरा गेजगे यांना सहा महिन्यांसाठी सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे.