
शेवगाव तालुक्यात शनिवारी (27 सप्टेंबर 2025) रात्री पासून सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील 113 गावे जलमय झाली आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा याचा जबर फटका बसला आहे. आठ महसूल मंडळांवर झालेल्या या अतिवृष्टीमुळे खरीपाची तब्बल 60 हजार हेक्टरवरील पिके चिखलात सडली आहेत. कापूस, सोयाबीन, तुर, उडीद, बाजरी, फळबागा आणि भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले आहे. “आपले नुकसान भरून काढणार कोण?” असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
शनिवारी रात्री वाढलेल्या पावसामुळे नांदणी, चांदणी, ढोरा, काशी, सकुळा, रेडी, सूर्यकांता, खटकळी आदी नद्यांना महापूर आला. पाणी नदीपात्र ओलांडून शेतात व गावात शिरले. त्यामुळे भगूर, वरूर, खरडगाव, आखेगाव, ढोरजळगाव, नेवशे, नांदूर विहिरे, सामनगाव, लोळेगाव, वडूले, वाघोली, आव्हाणे, जोहरापूर, टाकळी देवटाकळी, हिंगणगाव यांसह अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली. शेवगाव शहरातील सखल भागात पाणी शिरल्याने बसस्थानक, क्रांती चौक परिसरात वाहतूक धोकादायक ठरली. काही घरांत, दुकानांत पाणी घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले. बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पाणी घुसल्याने भुसार व्यापाऱ्यांचे धान्य ओले होऊन मोठा तोटा सहन करावा लागला.
वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत
सूर्यकांता नदीच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पाथर्डी-अहिल्यानगर, पैठण-गेवराई, नेवासा-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. दुपारनंतर काही प्रमाणात पाणी ओसरल्याने पैठण-गेवराई मार्ग खुला करण्यात आला. स्थानिक सामाजिक संघटनांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. रविवारी शेवगावचा आठवडे बाजार असूनही पावसाचे पाणी व चिखलामुळे बाजार भरू शकला नाही. ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. नगरपरिषदेने तातडीने भाजी मार्केट सुरू करून स्थानिक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली.
80 जणांचा जीव वाचवला
शहर टाकळी देवटाकळी येथील मिरजे वाघमारे वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. जवळपास 75 ते 80 रहिवासी अडकले होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी एअर फोर्सचे हेलिकॉप्टर मागवले होते. मात्र एसडीआरएफच्या जवानांनी व स्थानिक प्रशासनाने चप्पूंच्या साहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. सप्टेंबर महिन्यात तब्बल चार वेळा अतिवृष्टी झाली असून गेल्या 50-60 वर्षांतील विक्रम पावसाने मोडीत काढला आहे. आतापर्यंत तालुक्यात 800 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी संपलेल्या 24 तासांत सरासरी 89.3 मि.मी पाऊस झाला.
महसूल मंडळ निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे
- शेवगाव : 121.5 मि.मी (472.7)
- भातकुडगाव : 102.5 (390.3)
- बोधेगाव : 76.8 (481.3)
- चापडगाव : 76.8 (463.6)
- ढोरजळगाव : 109.5 (406.8)
- एरंडगाव : 72.8 (364.9)
- दहिगाव : 72.8 (400.7)
- मुंगी : 82.3 (486.9)