शिवद्रोही छिंदमला सभागृहाबाहेर हुसकावले, अहिल्यानगर पालिकेत अभूतपूर्व गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shripad-chhindam

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानांमुळे आधीपासूनच वादात असलेला शिवद्रोही नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभा राहताच इतर नगरसेवक आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला सभागृहात बोलू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. छिंदमला अक्षरशः सभागृहाबाहेर हुसकावून लावले.

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. सादर होणारे बजेट अधिकृत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत छिंदमने प्रशासनावर निशाणा साधला. मात्र, छिंदम बोलू लागताच सभागृहातील अनेक नगरसेवक संतप्त झाले. नगरसेवक गणेश भोसले आणि संपत बारस्कर यांनी छिंदमला बोलण्यास विरोध करत, तुला बोलण्याचा अधिकार नाही, असा इशारा दिला. महिला नगरसेविकांनीही घोषणांमध्ये सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच तापले.

मी निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, असे छिंदमने सांगितल्यानंतर आक्रमक नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला येथे स्थान नाही, असे म्हणत त्याच्याभोवती गर्दी केली. वाद चिघळत असताना छिंदमच्या समोरील माईक तोडण्यात आला. अखेर संतप्त नगरसेवकांनी छिंदमला सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले.

घटनेनंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. महापौरांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक नगरसेवकांनी स्पष्ट इशारा दिला की, छिंदमला पुन्हा सभागृहात प्रवेश दिल्यास आम्ही सभेला उपस्थित राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याला सभागृहात येऊ न देण्याचा ठराव करावा, अशी मागणीही एकमताने करण्यात आली. यामुळे सभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले. या वादामुळे पुढील सभांमध्येही संघर्षाची चिन्हे आहेत.