
संगमनेर शहरामध्ये एक व्यक्ती नदीपात्रात फुले टाकण्यासाठी गेला असता तोल गेल्याने नदीच्या प्रवाहात पडून वाहून गेला होता. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल 60 तास शोधमोहिम राबवल्यानंतर अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला ही दुर्दैवी घटना घडली होती. संगमनेर खुर्द कडे जाणाऱ्या छोट्या पुलावर मंगळवार (26 ऑगस्ट 2025) रोजी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत विजय संभाजी कुटे (40) हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये कामास निघाले होते. तत्पूर्वी ते नदीमध्ये फुले टाकून पुढे जाणार होते. परंतु नदीत तोल गेल्याने ते नदीमध्ये वाहून गेले. त्यानंतर घरच्यांनी तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाने दोन दिवस नदी पात्रात त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाही. सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली दोन दिवसांपासून पथके रवाने करण्यात आले होती. विजय कुटे यांचा मृतदेह रायते वाघापूर शिवारात वाटीच्या डोहा दरम्यान शुक्रवार (29 ऑगस्ट 2025) सकाळी 11.30 च्या दरम्यान आढळून आला. शव विच्छेदनानंतर विजय कुटे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली.































































