Ahilyanagar news – दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा तपासणी होणार!

अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचे युडीआयडी कार्ड तसेच या कर्मचाऱ्यांनी सेवेसह अन्य योजनांचा घेतलेला लाभ, याबाबत राज्य दिव्यांग विभागाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी असणारे दिव्यांग कर्मचारी व त्यांचे प्रमाणपत्र युडीआयडी याची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.

मुंडे यांच्या आदेशानंतर नगर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचारी व त्यांच्या प्रमाणपत्रासह युडीआयडीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन तीन टप्प्यांतील ऍक्शन प्लॅन तयार करणार असून, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 15 ते 16 हजार कर्मचाऱ्यांपैकी पाच टक्के नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल दिव्यांग कल्याण विभागाला पाठवणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील शिक्षकांनी बदलीत लाभ घेण्यासाठी आजारपणासह विविध आजारपणांची कागदपत्रे सादर करत बदलीचा लाभ घेतला असून, अशा सर्व शिक्षकांची प्राथमिक शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू असताना, आता पुन्हा दिव्यांग आयुक्त मुंडे यांच्या आदेशाची भर पडल्याने आता जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची तीन टप्प्यांत एकदम दिव्यांग प्रमाणपत्र, युडीआयडीची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पुढील आठ दिवसांत याबाबतचा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे.

‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार

पहिल्या टप्प्यात दिव्यांग असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑनलाइन युडीआयडी काढून घेणे, दुसऱ्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांकडे हा आयडी आहे, त्यांचे प्रमाणपत्र याची तपासणी करून घेणे (यात ज्या ठिकाणाहून संबंधित प्रमाणपत्र मंजूर झालेले आहे, त्यांच्याकडे संबंधितांने दिव्यांग तपासणीसाठी कधी केसपेपर काढलेल्या आहे, त्याच्या दिव्यांगाची तपासणी कधी झालेली आहे, ही तपासणी करणारे डॉक्टर यांचे रेकॉर्ड संबंधित जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे की नाही) याची खात्री करण्यात येणार आहेत. त्यानंतर डोळ्यांनी दिसणारे दिव्यांग सोडून उर्वरित सर्व दिव्यांगांची नव्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. यात दिव्यांग प्रमाणपत्राचे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. लवकर हा ऍक्शन प्लॅन तयार झाल्यावर त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

750 जणांची तपासणी

अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे 15 ते 16 हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यातील दिव्यांग सवलतीचा फायदा घेणारे 750 कर्मचारी अथवा त्याहून अधिक असतील, या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.