
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर), कापड बाजार यांच्या मालकीच्या स्टेशन रोडवरील अक्षता गार्डनसमोरील भूखंडावर असलेले मंदिर, प्रवचन स्थळ संगनमत करत पाडून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार संग्राम अरुण जगताप, गणेश हरिभाऊ गोंडाळ, ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष झुंबरलाल मुथा यांच्यासह सर्व ट्रस्टींविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे, जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी ही तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 6) माजी आमदार रवींद्र धंगेकर, खासदार नीलेश लंके यांनी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते.
ट्रस्टच्या नावे स्टेशन रोडवर वॉर्ड नंबर 21 मधील 44 चा सि.स.नं. फायनल प्लॉट नंबर 119चे क्षेत्रफळ 471.99 चौरस मीटर हा भूखंड आहे. या भूखंडावरील मिळकतीच्या तपशिलाची नोंद नगरपालिका दप्तरी परिशिष्ट ‘अ’मध्ये आहे. या भूखंडावर मंदिर होते, अशी नोंद अहमदनगर नगरपालिका दप्तरी आहे. त्याचे पुरावे काळे, गुंदेचा यांनी पोलिसांना दिले आहेत. जैन मंदिर ट्रस्टच्या नमूद भूखंडावरील मंदिर, तसेच प्रवचन स्थळ पाडण्यात आले आहे. यामुळे आमच्या धार्मिक आस्था, भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
भारतीय न्याय संहिता(बीएनएस)च्या कलम 298 नुसार कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला दुखापत करणे किंवा अपवित्र करणे हे कृत्य दंडनीय अपराध आहे. या गुह्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे. हा एक अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. अपराध्यांवर बीएनएस कलम 298 अन्वये तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार देत असल्याचे काळे आणि गुंदेचा यांनी म्हटले आहे.


























































