Ahilyanagar Rain – सीना नदीला महापूर, शासकीय बंधारा फुटल्याने शेतजमीनी वाहून गेल्या; अधिकाऱ्यांचा पंचनामा करण्यास विलंब

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सीना नदीला महापूर आल्याने शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील रातंजन-नागलवाडी गावांच्या शिवेवर सीना नदीच्याकाठी असलेला शासकीय बंधाऱ्यावरूनही पुराचे पाणी वाहत होते. मात्र, पाण्याचा येवा वाढल्याने बंधारा फुटला आणि शेतकऱ्यांच्या शेतजमीनी वाहून गेल्या आहेत. यामुळे उस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला नाही.

अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा पाटबंधारे विभागाकडून हिंगणी या गावात रातंजण-नांगलवाडी या गावांच्या शिवेवर हा शासकीय बंधारा बांधण्यात आलेला होता. मात्र सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शासकीय बंधारा फुटला. बंधारा फुटल्यामुले विलास विठ्ठल कवळे आणि लता विलास कवळे यांच्या शेतजमीनी वाहून गेल्या आहेत. त्यांनी लावलेल्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही पंचनामा करण्यात आलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्याची शेतजमीन अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत आणि बंधारा बीड जिल्हा पाटबंधारे विभागाने बांधला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा कोणी करायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी पंचनामा करण्यास विलंब करत आहेत. यामुळे शेतकऱ्याची मोठी कुचंबना झाली आहे. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, नुकसानीचा पंचनामा होत नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून याबाचत राज्य शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सीना नदीकाठी पूर्व दिशेला शासकीय बंधारा बांधलेला आहे. दि.22 सप्टेंबर रोजी रात्री सीना नदीला महापुर आल्याने, सदर बंधाऱ्यावरून पाणी जास्त वाहिल्याने आमची जमीन व उस पीक वाहून गेले असून, 25 फूट खोल खड्डा पडला आहे. सदर वस्तुस्थिती पाहून शासकीय पंचनामा व्हावा, मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून विलंब केला जात आहे, अशी माहिती शेतकरी विलास कवळे यांनी दिली.