‘अहिंसा रन’ची विक्रमी धाव, एकाच दिवशी ऐंशीपेक्षा अधिक ठिकाणी आयोजन, हजारो धावपटूंचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जगात शांतता आणि अहिंसा नांदावी म्हणून जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या (जितो) वतीने येत्या 2 एप्रिल रोजी मुंबईसह जगभरात ‘अहिंसा रन’चे आयोजन केले आहे. एकाच दिवशी हिंदुस्थानसह जगभरातील ऐंशीपेक्षा अधिक शहरांत या दौडीचे आयोजन करून या दौडीचे गिनीज बुकात नाव नोंदविण्याचे ध्येय आयोजकांनी डोळय़ांसमोर ठेवले आहे. या रनमध्ये प्रत्येक शहरामध्ये हजारो धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती जितो मुंबई विभागाचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी दिली.
जितोच्या ‘अहिंसा रन’मध्ये एकूण चार गट ठेवण्यात आले असून 10, 5 आणि 3 किमी अंतराच्या शर्यती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या शर्यतीत पट्टीचे धावपटूही उतरावेत म्हणून अर्ध -मॅरेथॉनचेही (21 किमी) आयोजन केले जाणार आहे. सर्व शर्यती वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानातून सुरू होतील. विशेष म्हणजे प्रत्येक गटातील विजेत्यावर रोख रकमांच्या बक्षिसांचा वर्षावही केला जाणार आहे.

विक्रमी आयोजन, पण शहरांबाबत अस्पष्टता

आजवर एकाच संस्थेच्या माध्यमातून एकाच दिवशी अनेक ठिकाणी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र जगभरात पसरलेल्या जैन धर्मीयांनी जितो संस्थेच्या माध्यमातून ऐंशीपेक्षा अधिक शहरांमध्ये मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. हिंदुस्थानात 65 पेक्षा अधिक शहरांमध्ये ‘अहिंसा रन’ केली जाणार असल्याचे आयोजकांकडून बोलले जात असले तरी 65 शहरांबाबत पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही. तसेच 23 देशांमध्येही या दौडीचे आयोजन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मात्र 23 देशांमधील कोणत्या शहरांमध्ये ‘अहिंसा रन’चे आयोजन केले जाणार आहे, याबाबत आयोजकांना समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे शांततेसाठी आयोजित केली जाणारी ही ‘अहिंसा रन’ नेमक्या किती शहरांत होईल आणि किती शहरांमधील आयोजनानंतर त्यांचा विक्रम गिनीज बुकात नोंदविला जाईल, याबाबत त्यांच्याकडून सुस्पष्टता मिळू शकलेली नाही.

इथे होणार ‘अहिंसा रन’

एकच संस्था आणि एकाच दिवशी ऐंशीपेक्षा अधिक शहरांमध्ये ‘अहिंसा रन’ आयोजित केली जाणार असून मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, संभाजीनगर, मालेगाव, शिरूर, जालना, पिंपरी-चिंचवड आणि इचलकरंजी या जिह्यांत ‘अहिंसा रन’चे आयोजन केले जाणार आहे.