
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनी करणार असल्याचे निश्चित झाले आहे. रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने (आरएलडीए) सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी आर्थिक निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार आलेल्या निविदांमध्ये अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीने सर्वात कमी 2450 कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या कायापालटाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्याची योजना जाहीर करत आरएलडीएने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी 1800 कोटी रुपये एवढा प्राथमिक खर्च प्रस्तावित केला होता. त्यानुसार लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍफकॉन इफ्रास्ट्रक्चर, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन या चार कंपन्या तांत्रिकदृष्टय़ा पात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आज आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून त्यामध्ये सर्वात कमी 2450 कोटींची निविदा अहलुवाया कंपनीने भरल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लार्सन ऍण्ड टुब्रो 4141 कोटी, ऍफकॉन इफ्रास्ट्रक्चर 3910 आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शनने 3667 कोटी रुपयांची निविदा भरली होती. त्यामुळे पुनर्विकासाचे काम अहलुवालिया कंपनीलाच मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

























































