इंधन पुरवठा बंद झाल्यानेच 34 सेकंदांत विमान कोसळले, अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल समोर

एअर इंडियाच्या बोइंग विमानाला अहमदाबादेत झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यानुसार विमानाच्या इंजिनाचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे अवघ्या 34 सेकंदांत विमान कोसळल्याचे समोर आले आहे.

एअरक्राफ्ट ऑक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्राथमिक तपासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. 15 पानांच्या या अहवालात विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये काय संवाद झाला याचीही माहिती आहे. एएआयबीच्या अहवालानुसार, 12 जूनच्या उड्डाणानंतर विमानाचा इंधन नियंत्रण स्विच तीन सेकंदांनी ‘रन’ वरून ‘कटऑफ’ स्थितीत गेला. काही सेकंद इंधन कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ती बदलून पूर्ववत करण्यात आली. मात्र तोपर्यंत विमान अपेक्षेपेक्षा खाली आले होते. पुन्हा सुरक्षित उंची गाठण्यासाठी वैमानिकांना वेळच मिळाला नाही. टेकऑफ आणि व्रॅशमध्ये सुमारे 34 सेकंदांचा वेळ होता. तूर्त कोणावरही कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही. अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह पुंदर या दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वैमानिकांमधील संवादही समोर

विमानाच्या कॉकपिटमधील ऑडिओ रेकार्ंडगचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. यात दोन वैमानिकांमधील संवाद आहे. त्यात एक वैमानिक दुसऱयाला तू इंधन पुरवठा का बंद केलास? असे विचारतोय, तर मी काहीच केले नाही, असे दुसरा वैमानिक सांगतोय.