अहमदाबादेत सज्ज होतेय जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम चक्क हिंदुस्थानात साकारले जातेय. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार असून ती ऑस्टेलियाच्या ‘बिग बॅश’ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडपेक्षा 10 हजारांनी अधिक आहे. जानेवारी 2020 मध्ये हे जगातले विराट स्टेडियम क्रिकेट लढतींसाठी सज्ज होणार आहे. त्याचे नूतनीकरण आता पूर्ण झाले असून केवळ सौंदर्यीकरण बाकी आले. या संपूर्ण नूतनीकरण प्रकल्पासाठी एकूण 700 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी दिली. हे स्टेडियम क्रिकेटशिवाय टेबल टेनिस, बॅडमिंटन,जलतरण आणि स्क्वाश या इनडोअर खेळांसाठीही सुविधा पुरवणार आहे.

अहमदाबादचे मोटेरा स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात प्रसिद्ध आहे. पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये जगातील सर्वात भव्य क्रिकेट स्टेडियम साकारण्याची योजना आखली. त्या योजनेची कार्यवाही आता पूर्ण होत आली आहे. आणखी दोन महिन्यांनी हे स्टेडियम लढतींसाठी सज्ज होणार आहे. त्यात मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा 10 हजार क्रिकेट शौकीन बसू शकणार आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचा बहुमान आता हिंदुस्थानला लाभणार आहे. या स्टेडियमचे नावही आता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.

एमसीजीच्या आर्किटेक्टनीच बनवलेय सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
मोटेरा, अहमदाबाद येथे एकूण 63 एकर जागेवर साकारण्यात आलेले सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम देशाचे भूषण ठरणार आहे. मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे उभारण्यात आलेले भव्य एमसीजी स्टेडियम उभारणाऱया आर्किटेक्ट्नीच मोटेरातील हे भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम साकारण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमची वैशिष्टय़े
1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात
63 एकर जागेवर स्टेडियम संकुल वसले आहे
76 कॉर्पोरेट बॉक्स बसवले आहेत.
4 ड्रेसिंग रूम्स, 3 सराव मैदाने
इनडोअर सराव खेळपट्टीचीही सुविधा
55 रूम्सचे क्लब हाऊस, प्रशिक्षण केंद्राची सुविधा
ऑलिम्पिक धर्तीचा स्वीमिंग पूल, बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट
स्क्वाश कोर्ट आणि थ्री डी प्रोजेक्टर्सची सुविधा
पूर्ण परिसर सौरऊर्जेने उजळवून टाकणार
300 मीटर अंतरावर मेट्रो स्टेशन
स्टेडियममधून थेट मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी मोठे रॅम्प ज्यावरून 60 हजार लोक चालू शकतील