
गुजरातच्या अहमदाबादमधील नवरंगपुरा भागात क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत विदेशी प्राणी आणि पक्ष्यांच्या बेकायदेशीर पैदास (Breeding) आणि तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपये किमतीचे विदेशी पक्षी आणि प्राणी जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे प्राण्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरंगपुरा येथील एका आलिशान इमारतीत गुपचूपपणे विदेशी प्राण्यांची पैदास केली जात असल्याची गोपनीय माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून संयुक्त मोहीम राबवली. छाप्यात आफ्रिकन पोपट, दुर्मिळ कासवं, रंगीबेरंगी परदेशी पक्षी आणि काही विदेशी प्राणी आढळून आले आहेत. हे सर्व प्राणी कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय आणि अत्यंत वाईट परिस्थितीत तिथे ठेवण्यात आले होते.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हे प्राणी हिंदुस्थानबाहेरून तस्करी करून आणले जात होते आणि त्यांची बेकायदेशीरपणे पैदास करून ते श्रीमंत ग्राहकांना मोठ्या किमतीत विकले जात होते. या रॅकेटचे जाळे केवळ गुजरातपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे परदेशापर्यंत जोडले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या कारवाईत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि हे रॅकेट किती काळापासून सुरू होते, याचा शोध आता अहमदाबाद पोलीस घेत आहेत.

























































