
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुजरातमध्ये येणार असून त्यांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. ट्रम्प येणार म्हणून त्यांना मार्गातील झोपड्या दिसून नये म्हणून भिंतीचे कुंपणही तयार केले जात असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताची दखल आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये एक आघाडीचं नाव असलेल्या ‘इंडिपेंडन्ट’ या वृत्तपत्रानेही घेतली आहे. या वृत्तात स्थानिक जनता या भिंत प्रकरणामुळे नाराज असल्याचं म्हटलं आहे.
या वृत्तात स्थानिकांनी व्यक्त केलेला रोषही नमूद करण्यात आला आहे. गरिबी हा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचा एक भाग आहे. तो झाकण्यासाठी करदात्यांनी दिलेला पैसा उधळणं चूक असल्याची टीका अहमदाबाद येथील स्थानिकांनीच केली आहे. गरिबी, झोपडपट्टी हेच वास्तव आहे. पण, मोदी सरकारला गरिबी झाकायची आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. 24 फेब्रुवारीला ते गुजरातमध्ये येतील. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा दावा करण्यात येत आहे. यावेळी एक रोड शो देखील आयोजित करण्यात येईल अशी शक्यता असून त्याच अनुषंगाने अहमदाबाद महापालिकेने झोपड्या झाकण्यासाठी भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे. सध्या जवळपास अर्धा किलोमीटर भिंतीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रगतिपथावर आहे. अहमदाबाद महापालिकेने हा भिंत उभारण्याचा निर्णय घेतला असून याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागामध्ये काही झोपड्या आहेत. या झोपड्या ट्रम्प यांना दिसून नयेत म्हणून महापालिकेने चक्क येथे भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे एक रोड शो करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गातील झोपड्या भिंतीमागे लपवण्यात येत आहेत.

























































