नगर जिल्ह्यात कोरोनाचे 15 संशयित रुग्ण

732

काल नगरमध्ये सापडलेल्या दोन करोना रुग्णांच्या संपर्कामध्ये संगमनेरमधील तब्बल पंधरा लोक आले होते. या सर्व जणांना संशयित म्हणून आज प्रशासनाने ताब्यात घेत पुढील तपासणीसाठी नगरला पाठवले आहे. तसेच त्यांचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर प्रशासनाने स्वच्छ केला असून तेथे आता प्रवेश बंदी केली आहे. दरम्यान या प्रकाराने संपूर्ण शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने देखील गंभीर दखल घेत यापुढे बाहेर दिसणाऱ्या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिला आहे.

रविवारी नगर येथे दोन परदेशी व्यक्ती करोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले होते. या व्यक्ती जिल्ह्यातील कोणाकोणाच्या संपर्कात आल्या याची माहिती जिल्हा प्रशासनाने काढली. त्याआधारे संगमनेरच्या प्रशासनाला माहिती देऊन संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्याचे सांगण्यात आले. स्थितीचे गांभीर्य ओळखत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप कचोरिया यांनी पथकासह संबंधित भागांमध्ये धाव घेतली. चौकशी केली असता तेथील तब्बल 15 व्यक्ती नगरमधील रुग्णांच्या थेट संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले. शहरातील या सर्व व्यक्ती नाईकवाडपुरा, रहेमतनगर, बागवानपुरा या परिसरात राहणारे आहेत. तर त्यातील एक तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राहतो. या पंधरा जणांपैकी एकाला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यालाही ताब्यात घेऊन सर्व 15 लोकांची रवानगी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी करण्यात आलेली आहे. आता त्यांचे अहवाल कसे येतात यावरच संगमनेरकरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण या पंधरा व्यक्ती शहरातील अनेक व्यक्तींच्या संपर्कात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाले तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. या पंधरा जणांच्या कुटुंबीयांना आणि या परिसरात राहणाऱ्या सर्वांनाच प्रशासनाने होम क्वारंटाईनचे आदेश दिले आहेत. तसे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात आले आहेत. शिवाय या परिसराची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे. तेथे आता प्रवेश आणि बाहेर पडणे याला बंदी करण्यात आलेली आहे. जर यातील एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर मात्र हा परिसर संपूर्णतः सील करण्यात येणार आहे. या सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची नियोजन प्रशासनाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या