
नगर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या 38 गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. झेंडीगेट परिसरात चार ठिकाणी गुरुवारी (दि. 24) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोनजण फरार झाले आहेत.
शहरातील झेंडीगेट भागात कत्तलीसाठी आणलेली गोवंशीय जनावरे मोठय़ा प्रमाणात डांबून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले. या पथकाने झेंडीगेट परिसरातील व्यापारी मोहोल्ला येथे छापा टाकला असता, तेथे नऊ गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या जनावरांची सुटका करीत आरोपी आलिशान रफिक कुरेशी (वय 30, रा. व्यापारी मोहोल्ला) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खाटीक गल्ली येथे छापा टाकला असता, तेथे 11 जनावरे आढळली. या जनावरांची सुटका करीत आरोपी अब्दुल रहिम कुरेशी (वय 45, रा.खाटीक गल्ली) याला ताब्यात घेण्यात आले.
तिसरा छापा व्यापारी मोहोल्ला येथील मशिदीच्या पाठीमागील बाजूस टाकण्यात आला. तेथून 10 जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे डांबून ठेवणारा आरोपी तौफिक युनूस कुरेशी (रा. व्यापारी मोहोल्ला) हा मात्र फरार झाला. त्यानंतर चौथा छापा झेंडीगेट येथे टाकण्यात आला. तेथून आठ जनावरांची सुटका करण्यात आली. त्यांना डांबून ठेवणारा आरोपी मोबीन कुरेशी (रा. झेंडीगेट) हा फरार झाला.



























































