
दिवसेंदिवस सेंद्रिय शेती काळाची गरज होत आहे. पूर्वी नैसर्गिक पालेभाज्या शेताच्या बांधावर, डोंगरावर मिळायच्या. मात्र, त्या आता लोप पावल्याचे दिसते. पूर्वजांच्या आहारात सकस आहाराचे प्रमाण चांगले असल्याने त्यांचे आयुष्यमान जास्त असायचे. सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात शरीराला सकस आहार न मिळाल्याने आजारांचे प्रमाण वाढून आयुष्यमान घटले आहे. नवनवीन रोगांमुळे जीवनाची शाश्वती राहिलेली नाही, असे प्रतिपादन संदीप गुंड यांनी केले.
कृषी विभाग ‘आत्मा’च्या वतीने नगरमध्ये ‘रानभाजी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी उपसंचालक विलास नलगे, ‘आत्मा’चे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, क्रांती चौधरी, श्रीकांत जावळे, उमेश डोईफोडे, कौस्तुभ कराळे, नंदू घोडके, अपूर्वा तोरडमल, सुनीता काळे, दीपाली दरेकर, जिवाजी लगड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
संदीप गुंड म्हणाले, निसर्गाने आपणास सर्व काही भरभरून दिले आहे. मात्र, आपणास ते ज्ञात नाही. नव्या पिढीने याचा अभ्यास करावा. कृषी विभागाने ‘रानभाजी महोत्सवा’च्या माध्यमातून जुन्या संस्कृतीला उजाळा दिला. शेतकऱयांनी काळाची गरज ओळखून शेती करावी. जोपर्यंत शेतकऱयांच्या मालाचा भाव शेतकरी ठरवत नाही, तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही, असे ते म्हणाले.
विलास नलगे म्हणाले, अंबाडी, पिंपळ, करटुले, करडू, गुळवेल, टाकळा, घोळ, दिंडा अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्यापासून व्हिटॅमिन्स मिळतात. आपल्याला आयुर्वेदाने मोठी देणगी दिली असून, त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसल्याने ती लोप पावत आहे. निसर्ग हा एक दैवी चमत्कार आहे. आयुष्यमान वाढवायचे असेल तर निसर्गाबरोबर चालायला हवे. वाढत्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे, असे ते म्हणाले. राजाराम गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. पोपटराव नवले यांनी रानभाजी महोत्सव आयोजनामागील उद्देश विशद केला. क्रांती चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर उमेश डोईफोडे यांनी आभार मानले.
























































