
नगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 14 जागांसाठी आज मतदान होणार आहे. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये एकूण 30 मतदान केंद्रे आहेत. मतमोजणी उद्या (सोमवार) ओम गार्डन येथे सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे.
नगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झालेली आहे. या निवडणुकीचे मतदान व मतमोजणीची प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण करण्यात आली आहे. फिरोदिया हायस्कूल येथे सकाळी 8.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक केंद्रावर 400 मतदार याप्रमाणे मतदानाचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या मतदान केंद्रांवर 450 कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी असून, पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मतदारांना ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही, असे निवडणूक अधिकारी गणेश पुरी व सहायक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी सांगितले.
सुयश पॅनल विरुद्ध अपक्ष लढत
शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाचे सुयश पॅनल विरुद्ध अपक्ष अशी लढत पाहायला मिळत आहे. संजय घुले यांच्या रूपाने बिनविरोध झालेली एक जागा यापूर्वीच सुयश पॅनलने जिंकली आहे. उर्वरित 14 जागांमध्ये काही अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत असून, त्यात अपक्षांना कितपत यश येते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.


























































