
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदीचे मोठे महत्त्व आहे. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी नगर शहरात आज सर्वत्र मोठी गर्दी दिसून आली. शिवाय शहरातील देवस्थानांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर काही मंडळांच्या वतीने नगर शहरांमध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी मोठी लगबग पाहायला मिळाली. लग्नसराईमुळे अनेकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीला पसंती दिली. अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी वेगवेगळ्या सवलती जाहीर केलेल्या होत्या. शहरात सोन्याचे भाव सुमारे 59 हजार रुपये होते. आज अनेकांनी सोने खरेदी केल्याचे शिंगवी व कायगावकर ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले.
जिह्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. मुहूर्तावर गाडी खरेदी करण्यासाठी अनेकांनी गाडय़ांचे बुकिंग केलेले होते. आज मुहूर्तावर दुचाकी मिळण्यासाठी अनेक शोरूममध्ये गर्दी दिसून येत होती. वासन टोयोटात दिवसभरात तब्बल 23 चारचाकी वाहनांचे ग्राहकांना वितरण करण्यात आले. मोबाईल दुकानदारांनीही विविध ऑफर दिल्या होत्या.
एकाच दिवसात 350 दस्तनोंदणी
जुन्या पेन्शनसाठी सब रजिस्ट्रार कार्यालयामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून दस्त नोंदणी थांबली होती. मात्र, आता संप मिटल्याने बुधवारी गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे मंगळवारी दस्तनोंदणीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दस्तनोंदणी बंद असल्याने स्टॅम्प खरेदीलाही प्रतिसाद मिळत नव्हता. मंगळवारी मात्र शहरातील सिव्हिल हडको परिसरात स्टॅम्प विक्री करणाऱया दुकानाबाहेर ग्राहकांची रांग लागली होती. दरम्यान, नगर जिह्यातील 17 सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये मंगळवारी 350 दस्तनोंदणी झाल्याची माहिती नगरचे सबरजिस्ट्रार टी. के. जाधव यांनी दिली.