थेट कलेक्टर साहेबांना ‘कट’ मारला, ‘हिरो’गिरी त्रिकुटाच्या अंगलट येणार

भरधाव वेगाने साहेबांच्या गाडीला ‘कट’ मारला.. मागून पुन्हा साहेबांनाच ‘थम्ब’ दाखवून ‘धूम’ ठोकून ‘हिरो’गिरी करणार्‍या त्रिकुटाच्या मागे कोतवाली पोलीस लागले आहेत. पोलिसांना अजूनही माग काढता आलेला नसला तरी खबरे, यंत्रणा पूर्णत: कामाला लावली आहे. दस्तुरखुद्द कलेक्टर साहेबांनाच ‘कट’ मारणार्‍या त्रिकुटांना कोणत्याही परिस्थितीत हजर करण्याचे फर्मान सुटले आहे.

कोतवालीच्याही साहेबांच्या नाकीनऊ आले आहे. सकाळपासून ‘हिरो’गिरी करत सुसाट जाणार्‍या मोटारसायकलीचा शोध सुरू आहेत. मात्र, अद्यापि यश आलेले नाही. 6899 या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून जाणार्‍या त्रिकुटाने साहेबांना ‘कट’ मारला आहे.

सकाळपासून कोतवाली पोलिसांनी सुमारे या क्रमांकाच्या पाच ते सहा मोटारसायकली ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला आहे. मात्र, तरीही त्रिकुट काही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. साहेबांच्या जीवाची घालमेल सुरू आहे. कलेक्टर साहेबांनी मोटारसायकलीचा क्रमांक लिहून घेतला. मात्र, त्याचा संपूर्ण क्रम काही टिपता आला नाही. त्यामुळे बेचेन झालेल्या साहेबांनी पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे. हिरो हाफ डिलक्स मॉडेलच्या सर्वच गाडीमालकांना कोतवाली पोलीस ठाण्यातून फोन गेले आहे.

पोलीस ठाण्यातून फोन आल्याने अनेकांचा जीव टांगणीला पडला आहे. या क्रमांकाची मोटारसायकल ही कर्जत येथील आहे. तेथून त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. नगर शहरातील तिघांनाही असाच निरोप धाडण्यात आला. कोतवालीच्या साहेबांनी चौकशी करून ज्यांचा संबंध नाही, त्यांना जाण्यास सांगितले आहे. मात्र, त्या त्रिकुटाचा अजूनही सुगावा लागलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या