विद्यार्थ्यावर टोळक्याकडून कोयत्याने हल्ला, नगरमधील दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील जीवघेण्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. आज (बुधवारी) सकाळी रेसिडेन्शियल महाविद्यालयासमोर न्यू आर्ट्स, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

युवराज गणेश गुंजाळ (रा. सोनेवाडी, ता. नगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

नगर शहरातील दोन महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांतील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते. नगर महापालिकेच्या बसने युवराज गुंजाळ माळीवाडा बस स्थानकातून रेसिडेन्शियल महाविद्यालयासमोरील बसस्टॉपवर आला होता. बसमधून उतरताच त्याच्यावर बुधवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या काही विद्यार्थ्यांच्या जमावाने कोयता व दांडय़ांनी हल्ला केला. यात युवराज गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर विद्यार्थी पसार झाले. युवराज गुंजाळला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता, हल्लेखोर विद्यार्थी लाल टाकी परिसरातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे समजले. हल्लेखोर तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत. युवराज गुंजाळ हा न्यू आर्ट्स कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर जमावाकडून हल्ला झाल्याने नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एकाच महिन्यात ओंकार भागानगरे, अंकुश चत्तर, माजी सैनिक विठ्ठल भोर यांच्या हत्येची प्रकरणे झाली आहेत. यातच विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने हल्ला झाल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.