नगरकरांना मिळणार चांगल्या दर्जाचे रस्ते, 802 कोटींचे अंदाजपत्रक मनपा आयुक्तांकडून ‘स्थायी’ला सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेचे 2022-23 या आर्थिक वर्षाचे 802 कोटींचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त शंकर गोरे यांनी स्थायी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्याकडे सादर केले आहे. अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली असून, सोमवारी (दि. 14) पुन्हा ही सभा होणार असल्याची माहिती सभापती वाकळे यांनी दिली. शहरवासीयांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी नवीन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, वीज, पाणी या सेवा चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 373 कोटी 91 लाख, भांडवली जमा 372 कोटी 4 लाख धरले आहे. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 51 कोटी 22 लाख, संकलित करावर आधारित करापोटी 67 कोटी 21 लाख, जीएसटी अनुदान 111 कोटी 67 लाख व इतर महसुली अनुदान 27 कोटी 65 लाख, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 26 कोटी 40 लाख, मीटरद्वारे पाणीपुरवठापोटी 42 कोटी, संकीर्णे 24 कोटी 80 लाख अशा महत्त्वाच्या तरतुदी आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून 372 कोटी 4 लाख रुपये अंदाजित जमा होणार आहेत.

खर्च बाजूला वेतन, भत्ते व मानधनावर 126 कोटी 36 लाख, पेन्शन 42 कोटी व 77 लाख, पाणीपुरवठा वीजबिल 33 कोटी, स्ट्रीट लाईट वीजबिल 3 कोटी, शिक्षण मंडळ वर्गणी 4 कोटी 30 लाख, महिला व बालकल्याण योजना 1 कोटी 60 लाख, अपंग पुनर्वसन योजना 1 कोटी 60 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 5 कोटी 25 लाख, सदस्य मानधन 1 कोटी 50 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी, सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 7 कोटी 47 लाख, कचरा संकलन व वाहतूक 3 कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 60 लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 70 लाख, अशुद्ध पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेदी 2 कोटी 30, नवीन रस्ते 15 कोटी, रस्ते दुरुस्ती 12 कोटी, इमारत दुरुस्ती 50 लाख, शहरातील ओढे-नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 40 लाख, कोंडवाडय़ावरील खर्च 20 लाख, वृक्षारोपण खर्च 85 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 40 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 41 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 35 लाख यांसह इतर बाबींबर खर्च प्रस्तावित केलेला आहे.

शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीतील कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामांसाठी शासन निधी मिळविणे, मनपा हिश्श्याची रक्कम भरणे आदी कामे तसेच घनकचरा संदर्भातील कामे, चितळे रोड भाजी मार्केट जागा विकसित करणे, नाटय़गृहाचे बांधकाम पूर्ण करणे, मीटरद्वारे पाणीपुरवठा, शहर स्वच्छता अभियान, गतिशील प्रशासन, तसेच शहर व उपनगरांमधील भागांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, सहायक आयुक्त सचिन राऊत, मुख्य लेखाधिकारी शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदींसह स्थायी समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.