कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृत्यू दाखले 600 रुपये दिल्यानंतरच मिळतात, असा आरोप झाल्यानंतर नगर महापालिकेने आजपासून जन्म-मृत्यूचे दाखले देण्यास प्रारंभ केला. जुन्या महापालिकेतील जन्म-मृत्यू कार्यालयात हे दाखले मिळणार आहेत.
महापालिकेचे जन्म-मृत्यू दाखले कार्यालय बंद असल्याने गरजवंतांचे हाल सुरू आहेत. याबाबत दैनिक ‘सामना’ने दोन दिवसांपूर्वी ‘कोरोनाने झालेल्या मृत्यूच्या दाखल्यांसाठी 600 रुपयांची लूट’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे शहरात खळबळ उडाली होती. मनपाचे जन्म-मृत्यू दाखले कार्यालय बंद असले तरी या कार्यालयाजवळील सेतू कार्यालय परिसरात काहीजण असतात व मृत्यू दाखल्याची तातडीने गरज असलेल्यांना हेरून त्यांच्याकडून 600 रुपये घेऊन दाखले देतात. तसेच, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील एका घरातूनही असे दाखले देण्यात येत असल्याच्या प्रकाराचा पर्दाफाश दैनिक ‘सामना’ने केला होता.
याबाबत आयुक्त शंकर गोरे यांनी दाखले देण्याच्या संदर्भामध्ये जुन्या महापालिकेत गर्दी होत असल्याचे मान्य केले होते. तसेच, दाखल्यांची जी किंमत आहे, तीच घेतली पाहिजे, असे सांगत अवाजवी पैसे घेतल्याची तक्रार आली तर संबंधितांवर कारवाई करू, असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता मनपा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत कार्यालय सुरू केले असून, आजपासून जन्म-मृत्यू दाखले वितरणास सुरुवातही केली आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात दाखले देण्यास सुरुवात झाल्याची माहिती सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी दिली. शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मनपाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यासाठी जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाऱयांच्या नेमणुका कोविड सेंटर व कंटेन्मेंट झोनमध्ये करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जन्म-मृत्यू विभाग बंद ठेवण्यात आला होता. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे मनपाच्या वतीने अंत्यविधी केला जात आहे. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचा समावेश होता. या मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू दाखल्याची गरज शासकीय कामासाठी भासत आहे. हे नातेवाईक दाखल्यासाठी हेलपाटे मारत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आयुक्तांशी चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने जन्म-मृत्यू कार्यालयातून दाखले देण्यास सुरुवात केली आहे, असे बारस्कर यांनी सांगितले.


































































