
नगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपती राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. समिती सभापती निवडीसाठी आज महापालिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगर विभागाचे सचिव एस. बी. तडवी उपस्थित होते.
राष्ट्रवादी-काँग्रेस विकास आघाडीकडून अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर, शिवसेनेकडून विजय पठारे यांनी अर्ज दाखल केला होता. महापालिकेत महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपचा महापौर झाला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवरची समीकरणे बदलली होती. आज सभागृहामध्ये राष्ट्रवादी 5, भाजप 4, काँग्रेस एक, बसपा 1 व शिवसेनेचे 2 असे 13 सदस्य उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे विजय पठारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी भोसले यांनी अविनाश घुले यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे घुले यांनी सांगितले.


































































